निवती समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक मोहीम..
⚡वेंगुर्ला, ता. ०४-: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने निवती समोरील समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई करत ती जप्त केली आहे.
दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) तसेच सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्यातील श्रीमती पल्लवी साईहर्षद धोंड, रा. पणजी-गोवा यांची ‘जय IV बॉस’ (नोंदणी क्र. IND-GA-२-MM-3588) ही नौका महाराष्ट्र राज्याच्या जलक्षेत्रात संशयास्पदरीत्या फिरताना आढळली.
सदर नौकेचा पाठलाग करून ती थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता, नौकेवर आवश्यक व वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच तपासणीदरम्यान नौकेवर अवैधरीत्या LED मासेमारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. या नौकेवर तांडेलसह एकूण २० खलाशी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संबंधित नौका जप्त करून सर्जेकोट बंदर येथे ठेवण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) तसेच सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रतिवेदन सादर केल्यानंतर सदर प्रकरणाची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या न्यायालयात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
