⚡बांदा ता.३१-: परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या उद्रेक करणाऱ्या माकडांचा अखेर वनविभागाच्या पथकाने बंदोबस्त केला. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या कारवाईत एकूण चार माकडे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
गेल्या काही दिवसांपासून ही माकडे नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, हल्ला करणे तसेच लहान मुलांवर झडप घालण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सातत्याने घडत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत आबा धारगळकर यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून आर.आर.टी. (रॅपिड रेस्क्यू टीम) पथकाला पाचारण केले.
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत सापळा लावून शोधमोहीम राबवली. दीर्घ प्रयत्नांनंतर परिसरात धुमाकूळ घालणारी चार माकडे जेरबंद करण्यात पथकाला यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
या कारवाईदरम्यान आर.आर.टी. प्रमुख रामचंद्र रेडकर यांच्यासह सदस्य शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, देवेंद्र परब, सूरज धामापूरकर तसेच नाना सावंत उपस्थित होते.
दरम्यान, माकडे जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाचे तसेच पुढाकार घेतलेल्या आबा धारगळकर यांचे आभार मानले.
बांदा परिसरातील उपद्रवी माकडांचा बंदोबस्त; चार माकडे जेरबंद…
