⚡बांदा ता.३१-: विद्यार्थ्यांच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी ही शिक्षकांची आहे हा समज चुकीचा. विद्यार्थ्यांचा जास्त वेळ हा पालकांसमवेत जात असल्यामुळे मुलांना शैक्षणिक वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही पालकांची असते. सातत्याने प्रयत्न करण्याची सवय मुलांना लावा. त्यांना कष्टाची सवय होऊ दे. चॅट जीपीटी, ए आय तंत्रांचा वापर इतक्यात नको स्वतःची बुद्धिमत्ता त्यांनी वापरली पाहिजे. मुलांना अपयशाचा सामना करू दे. त्यांची स्पर्धा स्वतःचीच असू दे. आपल्या पाल्याची दुसऱ्याशी तुलना करणे टाळा. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही वेगळी आहे. विद्यार्थ्यांना वेळेच महत्व पटवताना पालकांनी सुद्धा स्वतः चे उदाहरण त्यांच्या समोर ठेवा. तुमच्या मुलांना स्वतः वर विश्वास ठेवायला शिकवा. मोठी स्वप्ने बघायला शिकवा. असे मार्गदर्शन अधिव्याख्याता श्री नितीन बांबार्डेकर यांनी बांदा येथील विद्यार्थी व पालकांना केले. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. खेमराज प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बांदाचे माजी शाखा प्रमुख तसेच रोटरी क्लब बांदाचे माजी अध्यक्ष श्री सिताराम गावडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन गवस, संस्था समन्वय समितीचे सदस्य तसेच शालेय समितीचे सदस्य श्री अन्वर खान, शालेय समिती सदस्या सुनिता नाईक , अमृता महाजन, मुख्याध्यापक प्रदीप देसाई पर्यवेक्षक प्रमोद सावंत उपप्राचार्या मिलन वसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत सांगेलकर यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. मुख्याध्यापक प्रदीप देसाई यांनी प्रास्ताविक केले. तर सचिन गवस, ज्येष्ठ व्यक्तिमत्व अन्वर खान सुनीता नाईक आदी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ मिलिंद तोरसकर, अध्यक्षा श्रीम कल्पना तोरसकर व संस्था कार्यकारिणी सदस्यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पाठवल्या त्यांचे वाचन करण्यात आले. वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये तसेच वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि पारितोषिके देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. प्रमुख वक्ते श्री बांबर्डेकर सर हे बॅरिस्टर नाथ पै बी एड कॉलेज कुडाळ येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत शाळेतील बहुसंख्य शिक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन पदविका हा कोर्स पूर्ण केलेला आहे. यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री सिताराम गावडे यांनी मी या शाळेचे माजी विद्यार्थी आहे आणि शाळेतील मुलांची प्रगती आणि त्यांना मिळालेले यश बघून आम्हाला आनंद होतो. मुलांनी स्वतःला घडवावे, सामाजिक जबाबदारीची जाण ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा.अरुण सुतार तर बक्षीस वाचन सौ रश्मी नाईक यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षिका सौ वसकर मॅडम यांनी मानले.
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…
