८ रुग्ण नवजीवनाकडे:उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या सेवांचे कौतुक,अधिक रुग्णांनी लाभ घ्यावा;अशोक करंबेळकर..
⚡कणकवली ता.२९-: येथील उपजिल्हा रुग्णालयात २७ व २८ मार्च रोजी पार पडलेल्या स्पाईन सर्जरी शिबिराने आरोग्य सेवेत नवा आदर्श निर्माण केला. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण ८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये ७ मेजर आणि १ मायनर शस्त्रक्रियेचा समावेश असून सर्व रुग्ण आता स्थिर प्रकृतीत असून चालू लागले आहेत. मुंबई, कोल्हापूर आणि स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर यशस्वी झाले. मुंबई येथील तज्ज्ञ पथकात डॉ. शेखर भोजराज, डॉ. इस्माईल शेख, डॉ. आदित्य काशिकर, डॉ. निशाद सितूत, डॉ. प्रणित पावसकर, डॉ. रवी त्रिवेदी तसेच श्री. रोशन कुके यांचा समावेश होता. कोल्हापूर येथून डॉ. सलीम लाड, डॉ. रवी पटेल, डॉ. हृषिकेश पाटील, डॉ. अमेय गुप्ता व श्री. अमर दाभाडे यांनी सहभागी झाले होते.
स्थानिक स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा इनामदार, प्रभारी अधीक्षक डॉ. पंकज पाटील, ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. धनंजय रासम, डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, डॉ. वृशाली जाधव तसेच नर्सिंग व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. भूलतज्ज्ञ पथकात डॉ. हेमा तायशेटे व डॉ. रोहित कुरिल यांनी जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर एका रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने “द स्पाईन फाउंडेशन”तर्फे त्या रुग्णाला तातडीने खासगी आयसीयूमध्ये हलविण्यात आले. फाउंडेशनने याचा संपूर्ण खर्च उचलत तत्पर उपचार केले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवांचे विशेष कौतुक करत, “येथील डॉक्टर व वैद्यकीय यंत्रणा सक्षम असून अर्थोपेडिक उपचारांबाबत रुग्णांनी या शासकीय रुग्णालयावर ठाम विश्वास ठेवावा. अधिकाधिक रुग्णांनी येथे येऊन उपचारांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन केले. या यशस्वी उपक्रमामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयावरील विश्वास अधिक दृढ झाला असून तालुक्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण ठरत आहे.
