⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २८ व २९ मार्च रोजी बांदा येथील पाटेश्वर मैदानावर पार पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाहौशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत २०२६ मधील ४५+ गटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, जिल्ह्यातील अनुभवी क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच सिंधुदुर्ग जिल्हाहौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षीस वितरण समारंभ भाजप युवा नेते विशाल परब व सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध संघांचा सहभाग अपेक्षित असून, क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षण ठरणार आहे. आयोजकांनी सर्व क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शिरोडकर, सचिव राजेंद्र राणे, खजिनदार प्रशांत बांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष अभय नाईक तसेच जिल्हा सहसचिव राहुल रेगे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
बांदा येथे ४५+ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार…
