⚡सावंतवाडी ता.२६-: संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले. त्या परिस्थितीत ज्ञानाला भाषेची, गुरू-शिष्य परंपरेची मर्यादा होती. या मर्यादा बाजूला ठेवत वेळप्रसंगी व्यवस्थेला जाब विचारण्याच काम ज्ञानोबांनी केलं. हो मध्ये हो न मिसळण्याचा संदेश
संतांनी दिला. ज्ञानोबा, तुकोबांनी हो मध्ये हो मिसळाला नाही, अहंकार बाळगला नाही, मी पणा दूर सोडला. ”वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा” हे सांगण्याच धाडस संत तुकारामांच आहे. त्यामुळे आपणही थोडी चिकित्सा करावी असे प्रतिपादन स्वास्थ व समाज विषयक प्रबोधनकार, व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला कार्यक्रमात त्यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षा निमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ”ज्ञानियांचा राजा” मोगरा फुलला कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्याख्याते गणेश शिंदे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, विनायक गांवस, कार्यक्रम संयोजक सिद्धेश कुंठे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान आणि माऊलींचा जीवनप्रवास यांचा सुरेख संगम घडवून आणण्यात आला. प्रसिद्ध निरूपणकार गणेश शिंदे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून माऊलींच्या जीवनातील आपेगाव ते आळंदीपर्यंतच्या प्रवासाचे भावस्पर्शी वर्णन केले. ज्ञानेश्वरी हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवनाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. आजच्या काळात जेव्हा जग अशांततेच्या छायेत असताना पसायदानातून मिळणारा विश्वबंधुत्वाचा संदेश अधिकच समर्पक वाटतो. माऊलींच्या विचारांची मशाल प्रत्येकाने आपल्या घराघरांत तेवत ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
गायिका सन्मिता धापटे-शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग गायन खास आकर्षण ठरले. ‘अवघा रंग एक झाला’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ यांसारख्या रचनांनी सभागृहातील वातावरण भक्तीरसाने न्हाऊन निघाले. त्यांच्या सुरांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना पार्श्वगायक प्रतीक्षा डुडे , तबला अभिषेक पवार,संवादिनी स्वप्नील घाटोळे, बासरी कीर्तेश बाविस्कर, पखवाज विवेक शिळकर, साईड रीदम नरेंद्र काळे, कीबोर्ड प्रणव देशपांडे यांनी साथसंगत केली. संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र स्मृतींना आणि विचारांना स्वरांजली अर्पण करणारा हा कलाविष्कार उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला. सावंतवाडीकर रसिकांनी या बहारदार कार्यक्रमाला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली.
