प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, संतोष साटविलकर, रुहीता तांबे सभापती पदी विराजमान..
ओरोस ता २५
जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. महायुतीच्या सदस्यांची या पदांवर वर्णी लागली आहे. भाजपच्या प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य, अनुराधा नारकर यांना महिला व बालकल्याण तर शिंदे शिवसेनेच्यावतीने संतोष साटविलकर यांना वित्त व बांधकाम आणि रुहीता तांबे यांना समाजकल्याण अशाप्रकारे सभापती पदाची संधी देण्यात आली. यातील दोन सभापती यापूर्वी सभापती पदे भूषविलेले आहेत. त्यामुळे नव्या, जुन्या सदस्यांचा संगम साधण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी पीठासन अधिकारी शारदा पोवार यांच्या उपस्थितीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी ३ वाजल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. यापूर्वी सकाळी १०.४५ ते ११.१५ या कालावधीत प्रथम अध्यक्ष दालनात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपच्या वाट्याला आलेल्या शिक्षण व आरोग्य आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती पदाच्या उमेदवारांची घोषणा केली. रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या प्रितेश राऊळ यांना शिक्षण व आरोग्य तर पोंभुर्ले मतदार संघातून निवडून आलेल्या सुलोचना नारकर यांची महिला व बालकल्याण सभापती पदासाठी घोषणा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, गटनेते संजय बोबडी यांच्यासह भाजप पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
यानंतर उपाध्यक्ष दालनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उपनेते संजय आंग्रे यांनी शिवसेनेच्या वाट्याला दोन सभापती पदाच्या उमेदवारांची घोषणा केली. पेंडुर जिल्हा परिषद मधून निवडून आलेल्या संतोष साटविलकर यांची वित्त व बांधकाम सभापती आणि जानवली मतदार संघातून निवडून आलेल्या रुहिता तांबे यांची समाजकल्याण सभापती म्हणून उमेदवार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, उपाध्यक्ष दादा साईल, गटनेते केशव नारकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर चारही उमेदवारांचे अर्ज महायुती म्हणून एकत्रित पीठासन अधिकारी शारदा पोवार यांच्याकडे दाखल करण्यात आले.
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी पीठासन अधिकारी पोवार यांनी, चारही विषय समिती पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने या चारही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्व सदस्यांनी बाके वाजवून नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. यानंतर अध्यक्ष कामत आणि उपाध्यक्ष साईल यांनी चारही सभापतींना त्यांच्या दालनातील खुर्चीत विराजमान केले. यावेळी निवड झालेल्या चारही सभापतींच्या कार्यकर्त्यांनी तसेच भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. अभिनंदन करण्यासाठी रांग लागली होती.
