आचरा येथील महाराजस्व शिबिरात देवस्थान इनाम जमिनीबाबत चर्चा करणार…

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांना पूर्वसूचना..

⚡मालवण ता.२०-: आचरा ग्राम महसुल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दि.२५ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबिरात आचरा गावातील देवस्थान इनाम जमिनीबाबतच्या विविध मुद्द्यावर तहसीलदारांसोबत चर्चा करावयाची आहे, अशी पूर्व सूचना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा विभागामार्फत तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

ठाकरे शिवसेनेच्या आचरा विभागातील पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश लव्हे यांना सादर करत चर्चा केली. त्यावेळी आचरा गावचे माजी सरपंच मंगेश टेमकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, शाम घाडी, माणिक राणे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात देवस्थान जमीन विषयाच्या काही मुद्द्यावर चर्चा करावयाची असून त्याबाबत आगाऊ सुचित करत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. आचरा गांव १९७४ साली नायब तहसिलदार कुळ वहिवाट वर्ग ७ च्या अधिकाऱ्याने पूर्ण आचरा महसुली गांव व गाऊडवाडी महसुली गांव यामधील कोणत्याही खातेदाराला कोणतीही सुचना न देता श्री देव रामेश्वराची नोंद घालण्यात आलेली आहे. ती नोंद कुठल्या कागदपत्रांच्या आधारे घालण्यात आलेली आहे? याबाबत तहसीलदारांसोबत चर्चा करावयाची आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भविष्यात आचरा गावातून सागरी महामार्ग जात आहे. सदरची भू-संपादन प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सध्या गावातील वस्तुस्थिती पाहता जमिनीला ३ मालक (कुळ, वरिष्ठ कब्जेदार व कनिष्ठ कब्जेदार) आहेत. त्यामुळे भू-संपादनाचा मोबदला कोणाला व किती मिळणार ? गांव नमुना ३ हा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी २००५ मध्ये तयार केला आहे. तो कुठल्या आधारे तयार केला आहे आणि मुळ गांव नमुना ३ हा आपल्याकडे आहे की नाही? सदर देवस्थान इनाम जमिन मुळ दस्तऐवज यावरती सर्व्हे नंबरची नोंद असणारे आपल्याकडे उपलब्ध आहेत का? याचा तहसीलदारांनी खुलासा करावा. एलिनेशन रजिसटर, बोटखत, सनद, गांव नमुना ३ यांच्यावर सर्व्हे नंबरचा खुलासा आहे का? आचरा गावातील शेतकऱ्यांना फार्मर आय. डी. कुळ असल्यामुळे मिळत नाहीत. सदरची चुकी ही शेतकऱ्याची आहे की तहसीलदारांची आहे ? तहसिलदार यांच्या कार्यालयीन दस्तऐवजाप्रमाणे ३८५ एकर जमिन ही शासनाची दाखवलेली आहे ती पण सर्व्हे नंबरसहीत, ती जमिन आपल्या ताब्यात आहे का? याबाबतीत आपण याचा खुलासा करावा. सदरच्या कार्यक्रमासाठी साऊंड सिसटीमची सोय करण्यात यावी. जेणेकरून जी चर्चा होईल ती सर्व ग्रामस्थांना समजली जाईल, असे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page