प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर..
⚡सावंतवाडी ता.१५-: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्यावतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यावर्षीचा ‘स्व. प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला-सांस्कृतिक सेवा पुरस्कार’ राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांना जाहीर झाला आहे. तसेच, स्व. ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार’ कीर्तनकार तथा सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कोमसापचे शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केली. पुरस्काराचे वितरण शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या ‘चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात’ होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘कोमसाप’ सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. आज स्मृतिदिन स्व. प्रा. भोसले व ॲड. नेवगी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कोमसापचे अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, सदस्य दिनानाथ नाईक यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
