शिवशंभू ग्रुप मळगावचा उपक्रम..
⚡सावंतवाडी ता.१४-: स्वराज्यासाठी व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत झुंज देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देणारा विशेष उपक्रम मळगाव येथे सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता येथील शालेय मैदानात १८ फेब्रुवारीपासून बलिदान मासाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम सलग १८ मार्चपर्यंत अखंडितपणे चालणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे निर्भय नेतृत्व, धर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि अपार सहनशीलता या मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या हेतूने मळगाव येथील शिवशंभू ग्रुपने प्रथमच या उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो आचरणात उतरावा, अशी भावना या बलिदान मासामागे असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
काल शुक्रवार, १३ मार्च रोजी या उपक्रमांतर्गत बलिदान मासातील २४ वे पुष्प अर्पण करण्यात आले. दररोजच्या नियोजनानुसार सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रप्रेरणा देणारे विचार, ध्येयवाक्ये तसेच स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडण्यात आले.
या उपक्रमातून हिंदू समाजामध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण करणे, राष्ट्रहिताची भावना जागवणे आणि इतिहासातील बलिदानातून प्रेरणा घेऊन सकारात्मक वाटचाल करण्याचा संदेश दिला जात आहे. शिवशंभू ग्रुप मळगावचे कार्यकर्ते दररोज नियमित सहभाग घेत असून परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या राष्ट्रप्रेरक उपक्रमात सहभागी होऊन धर्मवीरांच्या बलिदानास मानवंदना द्यावी, असे आवाहन शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.
