चालत फिरण्याच्या अनोख्या शैलीमुळे जिल्ह्यात ओळख: अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते..
सावंतवाडी:
जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारे आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आकेरी येथील तेजस खटावकर यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने आकेरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तेजस खटावकर हे आपल्या चालण्याच्या सवयीमुळे जिल्ह्याला परिचित होते. दत्तगुरुंचे निस्सीम भक्त असलेले तेजस नेहमीच भक्तिभावात तल्लीन असायचे. त्यांची ओळख केवळ एक सामान्य नागरिक म्हणून नव्हती, तर कोणत्याही नेत्याला अगदी उघडपणे आणि हक्काने हाक मारणारे व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. जिल्ह्याच्या कोणत्याही भागात एखादा मोठा कार्यक्रम किंवा नेत्याचा वाढदिवस असला, तरी तेजस त्या ठिकाणी न चुकता हजर असायचे. विशेष म्हणजे, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी त्यांचे अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते होते.

आज पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
