छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विद्यामंदिर मैदान पर्यंत निघणार यात्रा:ढोल – ताशा, लेझीम, वारकरी दिंडी व दुचाकी रॅलीचा असणार सहभाग…
⚡कणकवली ता.१०-: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कणकवली शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता या सांस्कृतिक सोहळ्याला प्रारंभ होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने प्रसाद ठाकूर यांनी दिली.
येथील उत्कर्षा हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नंदू आरोलकर, प्रतिभा करंबेळकर आदी उपस्थित होते.
प्रसाद ठाकूर म्हणाले की, गेली चार वर्षे या यात्रेचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. ही स्वागत यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर पटवर्धन चौक मार्गे ही यात्रा विद्यामंदिर मैदानावर पोहोचेल. विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे या यात्रेचा भव्य समारोप होणार आहे.
यंदाच्या स्वागत यात्रेचे स्वरूप अधिक व्यापक आणि आकर्षक असणार आहे. यामध्ये विशेष वेशभूषेतील देखावे, ओम चिन्ह अंकित असलेले भगवे झेंडे घेतलेले शिस्तबद्ध ध्वजपथक, वारकरी दिंडी, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक तसेच युवकांच्या वतीने काढण्यात येणारी भव्य दुचाकी रॅली यांचा सहभाग असणार आहे.
या मंगलमयी सोहळ्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. कणकवलीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, कणकवली यांनी केले आहे.
