सुशांत नाईक:मोर्चा निघणार हे समजल्यानंतर बागायतींची केली पाहणी..
⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाल्याचा दावा करत नुकसानभरपाईची मागणी तीव्र झाली आहे. देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी व आंबा-काजू बागायतदारांनी आवाज उठवला असून शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने १२ मार्च रोजी जिल्हाव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोर्चाची घोषणा होताच पालकमंत्री नुकसानग्रस्त बागायतींची पाहणी करत असून मोर्चा दडपण्याची भाषा केली जात असल्याची टीका युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली. कणकवली येथील उपनगराध्यक्ष दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे उपस्थित होते.
नाईक म्हणाले, यंदा हवामानातील बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. मोहोर काळा पडल्याने मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. त्यामुळे आंबा व काजू पिकाचे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. याबाबतचा नजरपाहणी अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केला असला तरी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही नुकसानभरपाईबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गतवर्षी जिल्ह्यात आंबा व काजू पिकावर थ्रिप्स रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी बागायतदारांनी लाखो रुपये खर्च करून कीटकनाशकांची फवारणी केली; मात्र ती कीटकनाशके बोगस ठरली आणि त्याचा काहीही फायदा झाला नाही. आंदोलनानंतर तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्र्यांनी बोगस कीटकनाशकांचे पैसे देऊ नका, असे आवाहन केले होते. तरीही पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केल्याचा आरोप नाईक यांनी केला.
गेल्या महिनाभरापासून बागायतदार नुकसानभरपाईसाठी मागणी करत आहेत; मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकरी व बागायतदारांमध्ये असंतोष वाढत आहे. देवगडमधून या आंदोलनाची सुरुवात झाली असून त्याला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. १२ मार्च रोजी मोर्चा काढण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी जिल्ह्यात येऊन गेले होते. त्यांनीही शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.
नाईक यांनी पुढे सांगितले की, शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा अध्यादेश काढला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही केंद्रे ग्रामपंचायतीच्या जागेत उभारली जाणार असून त्यासाठी शासन भाडे देणार आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच असल्याने या केंद्रांच्या उभारणीबाबत चालढकल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे बागायतदारांना अचूक हवामान माहिती मिळत नसल्याने त्याचा मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
