Headlines

आयुष्यात आलेली सर्व जळमटे आणि किल्मिषे बाजूला सारून आयुष्याला सामोरे जा…

साहित्यिका कल्पना बांदेकर :कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये मराठी भाषा दिन साजरा..

⚡मालवण ता.०६-:
आज काल आत्महत्या करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत खास करून तरुण-तरुणी आत्महत्येकडे “उपाय” म्हणून पहात असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे मात्र सुंदर जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मधील कलेत गुंतून घेतले पाहिजे मग ती नाट्य कला असेल वाचन कला असेल आपल्यातील इतर ज्या ज्या अंगभूत कला आहेत त्यांची जोपासना करीत आयुष्याला सामोरे गेल्यास आपले जीवन सफल आणि समृद्ध बनेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका आणि अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि जूनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ साहित्यिका कल्पना बांदेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ कवियत्री सौ संध्या तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी बांदेकर या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक सहसचिव साबाजी गावडे स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर मुख्याध्यापिका देवयानी गावडे मराठी विभाग प्रमुख श्री संजय पेंडूरकर भूषण गावडे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते

प्रारंभी मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले

आपल्या भाषणात कल्पना बांदेकर यांनी विध्यार्थ्यांना जीवन जगण्याचे सार सांगताना अनेक दाखले दिले त्या म्हणाल्या कला ही आपल्याला सुंदर जीवन जगायला शिकवते आयुष्यात कसं जगाव याचे धडे देते म्हणून ज्या ज्या वेळी आत्महत्या सारख्या विचार येतील त्या त्या वेळी आपण कलेत गुंतवून घेतलं पाहिजे मानसिक ताणतणाव बाजूला सारून, आयुष्यात आलेली सर्व जळमटे आणि किल्मिषे बाजूला सारून आयुष्याला सामोरे जात जीवनाची वाटचाल केली पाहिजे असे सांगितले

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवियत्री तथा साहित्यिका सौ संध्या तांबे यांनी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितांमधून माणसाला निसर्गाकडे जाण्याचा मार्ग दाखविला. कुसुमाग्रज यांनी आपल्या कविता व साहित्यामधून सामाजिक भान दाखवले असून आपल्या लिखाणातून त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली. कुसुमाग्रज यांनी सर्व प्रकारचे साहित्य लिहून साहित्य विश्व व मराठी भाषा समृद्ध केली, त्यामुळेच त्यांचा जन्म दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी मराठी ही अतिशय समृद्ध भाषा आहे, मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी शाळांमध्ये आजच्यासारखे कार्यक्रम होणे आवश्यक आहेत. मराठी बोलण्याबरोबरच मराठी वाचत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही मराठी वाचन वाढविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील लिखाण कौशल्य वाढविल्यास नवे साहित्यिक घडण्यास ग्रामीण भागातून आशेचा किरण आहे, असेही अजयराज वराडकर म्हणाले.

यावेळी साहित्यिका कल्पना बांदेकर यांचा अजयराज वराडकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर सौ संध्या तांबे यांना संस्थेचे सचिव श्री सुनील नाईक यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला शेवटी समीर चांदरकर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केलेकार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा रितेश जांभवडेकर, सौ समीक्षा दळवी, ग्रंथपाल सौ श्रेया सुकाळी यांनी अथक परिश्रम घेतले

You cannot copy content of this page