आखाती देशांतील युद्धस्थिती पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क…

१०२ नागरिकांची माहिती संकलित: ११ जणांना तातडीची मदत आवश्यक…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून संकलित माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे.

जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण १०२ नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी ११ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या नावांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८८४७ / १०७७ तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८६१४ या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. संबंधितांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आखाती देशांतील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page