⚡बांदा ता.०१-: मराठी मातृभाषेचा गौरव जपण्यासाठी थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त बांदा नट वाचनालयात मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत होते. यावेळी सेक्रेटरी राकेश केसरकर, सदस्य प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून “माझ्या आठवणीतील कविता” हा विशेष काव्यवाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. अनंत भाटे यांनी ‘मेघदूत’ व ‘विशाखा’ या काव्यसंग्रहांबाबत विचार मांडले. यानंतर गौरी सावंत, शुभ्रा तेली, स्नेहा सावंत, तेजस्विनी यादव, अर्चना सावंत, स्नेहा नाईक, लक्ष्मी सावंत, सुनीता नाईक, स्वाती सावंत, स्वप्नीता सावंत, सिद्धी प्रभुशिरोडकर यांनी विविध मराठी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
तसेच व्ही. एन. नाबर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीही मराठी कवितांचे सादरीकरण केले. सदस्य प्रकाश पाणदरे यांनी मराठी भाषा गौरवदिनाचे महत्त्व अधोरेखित करत आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास अन्वर खान, लवू गावडे, उदय सावळ, निलम सावंत यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थित्यांचे आभार मानले.
वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त बांदा नट वाचनालयात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात साजरा…
