अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिरीष नाईक, सौ. दिप्ती मयेकर, सौ.चेतना गडेकर यांनी आपले अर्ज घेतले मागे..
⚡दोडामार्ग ता.२७-: अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.
दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या कोलझर पंचायत समितीतुन शिरीष नाईक, साटेली भेडशी जिल्हा परिषदेतून माजी सभापती सौ दिप्ती मयेकर, पंचायत समिती कोनाळमधुन सौ. चेतना गडेकर या भाजपाच्या कार्यकर्त्यांची आज भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालभाई परब यांनी समजूत काढत त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी उद्युक्त केले. त्यांच्या विनंतीला मान देत दोडामार्गमध्ये या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा निर्णय झाला असून याठिकाणी आपण एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊया. महायुती विजयी झाली पाहिजे हेच आपले ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीला प्रचंड यश मिळणार असल्याचा विश्वास यावेळी भाजपा युवानेते विशालभाई परब यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.
