अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली: नगरसेवक अजय गोंदावळे यांनी देखील घटनास्थळी घेतली धाव..
⚡ सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गवताला आज दुपारी सुमारे पावणेचारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरोडा नाका येथील मराठा हॉस्टेललगत असलेल्या गवतामधून आगीचे लोळ दिसताच नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. सूचना मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
