दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी: आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल..
⚡मालवण ता.१७-: मालवण दांडी किनाऱ्यावर पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. दांडेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या या हाणामारीत बियर बॉटल, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि होडीच्या वल्ह्याचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटातील बरेच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत फिर्यादी युवराज नितीन तोडणकर (वय १९, रा. वायरी मोरेश्वरवाडी) याने दिलेल्या तक्रारीनुसार काल दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास युवराज तोडणकर हा त्याचा मित्र रोहित चांदेरकर याच्यासमवेत दुचाकीवरून कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी जात असताना त्याच्या ओळखीचा सुजल संतोष केळूसकर व सुयोग परब हे समोरून येत होते, युवराज हा गाडी अंगावर घालत असल्याच्या समजातून सुजल केळूसकर याने चालत्या गाडीवर युवराज याच्या पायावर तसेच सुयोग परब याने रोहित चांदेरकर याच्या पायावर लाथ मारली. हा प्रकार युवराज याने आपल्या वडिलांना कळविला. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास युवराज तोडणकर याचे वडील नितीन द्वारकानाथ तोडणकर हे स्कुबा डायव्हिंग करून दांडी येथील दांडेश्वर मंदिराच्या समोरील समुद्रकिनाऱ्यावर परतले असताना सुजल संतोष केळुसकर, संतोष केळुसकर आणि रोहित केळुसकर यांनी त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यांनी नितीन तोडणकर यांच्या डोक्यात बिअरच्या बाटली मारली तसेच दांड्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या कामगार राजन कांदळगावकर, सचिन आडकर यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मालवण पोलिसांनी याप्रकरणी सुजल केळुसकर, संतोष केळुसकर, रोहित केळूसकर, सुहास कोयंडे, जयेंद्र शिरपुटे (सर्व रा. दांडी मालवण) यांच्यासह ८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सुजल संतोष केळुसकर (२१, रा. दांडी अपराधवाडी) यानेही परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून त्यानुसार या घटनेची सुरुवात दुपारी २ च्या सुमारास झाली. सुजल आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना समोरून दुचाकीवरून येणाऱ्या युवराज तोडणकर याने कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. युवराजच्या वडिलांनी त्याला ठार मारण्याची धमकी देऊन दांडेश्वर मंदिराकडे बोलावले. सुजल आपल्या कुटुंबासह तिथे गेला असता आरोपी नितीन तोडणकर याने होडीच्या वल्ह्याने सुजलचे काका महादेव केळुसकर यांच्या खांद्यावर आणि सुजलच्या हातावर वार करून जखमी केले. या झटापटीत गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि दंगल करणे, महिलांचा विनयभंग करणे, धमकी देणे आणि शांतता भंग करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेतील गंभीर जखमी नितीन तोडणकर व राजन कांदळगावकर यांना मालवण मधील प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. दांडी किनाऱ्यावर पर्यटकांसमोरच घडलेल्या या जबर हाणामारीच्या घटनेमुळे दांडी परिसरात तणावाचे वातावरण आहे. याबाबत मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.
