दैवज्ञ गणपती मंदिराची नवी कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची निवड:तर सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर यांची निवड..

⚡सावंतवाडी, ता.१६-:
दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. संतोष वसंत चोडणकर, उपाध्यक्षपदी श्री. शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर यांची निवड करण्यात आली.

या सभेमध्ये नवीन वर्षात साजरे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच मागील व चालू वर्षात शैक्षणिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व पुरस्कारप्राप्त दैवज्ञ समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्याचा ठराव नव्या कार्यकारिणीने मंजूर केला.सभे दरम्यान सुवर्ण व्यवसायात सध्या येणाऱ्या अडचणी, भविष्यातील फायदे-तोटे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाज एकत्रित राहावा यासाठी स्नेहमेळावे तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.

सुवर्ण व्यवसायामध्ये होत असलेल्या बदलांनुसार सुवर्णकारागिरांसाठी नव्या डिझाइन्स तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित करणे, समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन नवीन सुवर्णकारागीर घडविणे, महिला, युवक व युवतींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबतही चर्चा झाली.सोन्या-चांदीच्या वाढत्या दरामुळे सुवर्णकारागिरांवर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबाबत उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सुवर्ण व्यावसायिकांनी नवनवीन डिझाइन्सचे प्रशिक्षण घ्यावे तसेच नवतरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळून रोजगारनिर्मिती करावी, यासाठी लवकरच युवक व कारागिरांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे अध्यक्ष संतोष चोडणकर यांनी सांगितले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पनवेलकर तसेच माजी कार्यकारिणी सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सभेस सावंतवाडी शहरातील दैवज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


You cannot copy content of this page