‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाची सामाजिक बांधिलकी; स्मशानभूमी पत्रा शेडसाठी १ लाखांची देणगी…

⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर गांधी चौक बांदाच्या ‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाने आज एक आदर्शवत पायंडा घालताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बांद्यात व्यापारी संघाच्या माध्यमातुन बांधण्यात येत असलेल्या वैकुंठ भूमी(स्मशानभूमी) येथील पत्रा शेडसाठी एक लाख रुपयांची देणगी दान स्वरूपात दिली.
बांद्याच्या बाप्पा मंडळाची ही सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. बांदा व्यापारी संघाच्या माध्यमातुन बांदा येथील स्मशानभूमीत पत्र्याची शेड उभारण्याचे काम सुरु आहे. यासाठी या गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून देणगी देत हातभार लावला आहे.
मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांच्या हस्ते ही एक लाखाची रोख रक्कम व्यापारी संघाच्या अजय महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वेश गोवेकर, भाऊ वाळके, प्रसाद वाळके, भाऊ (विठ्ठल) वाळके, ओंकार नाडकर्णी, साईप्रसाद काणेकर, निखिल मयेकर, सुधीर शिरसाट, राकेश केसरकर, राजेश विरनोडकर, अजिंक्य पावसकर, स्वप्नील पावसकर, निलेश उर्फ पापू कदम आदी उपस्थित होते.
‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाने सामाजिक बांधिलकीचा वसा कायम ठेवला आहे. यापूर्वी कोरोना काळात गरजूना अन्नधान्य वितरण, बांद्यातील काही गरजुना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, पूर परिस्थितीत नुकसान झालेल्याना आर्थिक मदत आदी प्रकारची आर्थिक व वस्तुरूपी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांसाठी हा वसा आदर्शवत असाच आहे.
फोटो:-
बांदा व्यापारी संघाला आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करताना गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

You cannot copy content of this page