माटणे जि.प. मतदारसंघात स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या…

शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका; बाहेरून लादलेल्या उमेदवारांना स्पष्ट नकार…

⚡दोडामार्ग ता.१५-:
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट व आक्रमक भूमिका घेतली आहे. “या वेळी उमेदवारी फक्त आणि फक्त स्थानिक, सक्षम व जनतेशी नाळ जुळलेल्यालाच द्यावी,” अशी ठाम मागणी करत त्यांनी बाहेरून लादल्या जाणाऱ्या उमेदवारांना स्पष्ट नकार दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नेतृत्वाला डावलले जात असल्याने माटणे जिल्हा परिषद मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार, आरोग्य, शिक्षण तसेच युवकांशी संबंधित प्रश्न आजही प्रलंबित असून, बाहेरील किंवा लादलेल्या उमेदवारांमुळे हे प्रश्न सुटले नसल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी झरेबांबरचे सरपंच अनिल शेटकर आणि पिकुळेचे सरपंच आप्पा गवस यांनी एकमुखी भूमिका मांडत स्थानिक उमेदवार मिळालाच पाहिजे अशी ठाम मागणी केली. स्थानिक उमेदवारच नागरिकांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना उपतालुकाप्रमुख बबलू पांगम, शिवसेना पदाधिकारी विठोबा उर्फ दादा पालेकर तसेच तळेखोलचे उपसरपंच महादेव नाईक यांनीही भूमिका स्पष्ट केली. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नेतृत्वालाच संधी देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असलेला पक्ष म्हणून शिवसेनेने जर स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी दिली, तर ही निवडणूक पक्षासाठी सोपी व निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी युवा, तरुण आणि धडाडीचा चेहरा आवश्यक असल्याचे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी कोणतीही तडजोड न करता स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी, अन्यथा मतदारसंघात तीव्र जननाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

You cannot copy content of this page