जिल्हा नेतृत्वाच्या ‘अकार्यक्षम’ कारभारामुळे मालवणात भाजपची पिछेहाट…

बाबा मोंडकर यांचा मालवण मंडल अध्यक्षासह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा..

⚡मालवण ता.१४-:
गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत संघटना वाढवणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. मालवण नगरपालिका निवडणुकीत मालवण शहरातील भाजपच्या टीमला थांबवून जिल्हा नेतृत्वाकडून एक वेगळीच समांतर यंत्रणा राबविली गेली, जिल्हा नेतृत्वाच्या या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असा आरोप मोंडकर यांनी करत आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांची अशी वाट लावावी हे अपेक्षित नव्हते, अशी खंतही व्यक्त केली.

मालवण येथील हॉटेल महाराज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर यांनी आपली राजकीय व्यथा मांडत भाजपच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी युवा दशेत असताना पक्षाशी जोडलो गेलो. गेले २२ वर्षे मी भाजपसाठी काम केले, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. लोकसभा निवडणुकीत खास. नारायण राणे आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आम. निलेश राणे यांच्या विजयासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. लोकसभा आणि विधानसभेला माझ्यावर जबाबदारी असलेल्या मालवण शहरातून आणि देवबाग जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य मिळवून दिले. खास. नारायण राणे व आम. निलेश राणे यांच्या विजयानंतर मालवण शहरात भाजप पक्ष चांगल्या स्थितीत आला होता. भाजपकडे १३ पेक्षा जास्त नगरसेवक होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विजयात ज्या भाजप कार्यकर्त्यांनी योगदान दिले त्यांना नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून न्याय मिळेल अशी आशा होती. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या वेळी जिल्हा नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम झाले, असा आरोप मोंडकर यांनी केला.

मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे कार्यकर्ते यांना डावलून त्याचप्रमाणे अनेक वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलून तिसऱ्याच समांतर यंत्रणेच्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात झुकते माप देण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देणारी आम्हा कार्यकर्त्यांची टीम असताना आम्हाला बाजूला ठेवून नगरपालिका निवडणुकीत जिल्हा नेतृत्वाकडून वेगळीच समांतर यंत्रणा राबविण्यात आली. यामुळेच निवडणुकीव्हा दरम्यान भाजपमधील काही कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडून इतर पक्षातून निवडणूक लढवून निवडूनही आले, असेही मोंडकर म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत मित्रपक्षासोबत (शिवसेना-शिंदे गट) युती करण्याबाबत जिल्हा नेतृत्वाने संभ्रम निर्माण केला. सुरुवातीला युती न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, मात्र मित्र पक्ष शिंदे शिवसेनेकडून युतीसाठी प्रयत्न होत असताना युती करण्याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्यास सांगले गेले. मात्र नंतर जिल्हा नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली, जी भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली. निवडणुकीपूर्वी एक मजबूत पक्ष म्हणून जनतेच्या नजरेत असलेला भाजप पक्ष निवडणूक प्रक्रियेत मागे पडत गेला आणि पराभव स्वीकारावा लागला. राज्यामध्ये भाजप क्रमांक एकवर असताना मालवणमध्ये मात्र जिल्हा नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेमुळे आणि चुकीच्या कॅल्क्युलेशनमुळे पक्षाची पीछेहाट होत आहे, असेही यावेळी बाबा मोंडकर म्हणाले.

इतकी वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांचा प्रक्रियेत समावेश न करता जिल्हा नेतृत्वाकडून ही कोणती रणनीती राबवली जात आहे, कोणत्या दिशेला पक्ष जात आहे, हे सर्व आम्हा कार्यकर्त्यांसाठी भयानक व अनाकलनीय होते. याबाबत जेव्हा आम्ही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा “पटत नसेल तर राजीनामा द्या” असे उत्तरे जिल्हा स्तरावरून दिले गेले. यामुळे मी त्याच वेळी राजीनामा देणार होतो, मात्र इतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबलो. मात्र, आता राजीनामा देत आहे. कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेण्याची पद्धत आता सहन होत नाही. अशाच पद्धतीने कार्यपद्धती राहिल्यास भाजपची मालवणमध्ये पिछेहाट होण्यास वेळ लागणार नाही. इतकी वर्षे ज्या परिवारासाठी तन, मन, धन अर्पण करून काम केले, तिथून बाहेर पडणे आनंदाची गोष्ट नाही, तर अत्यंत दुःखाची आहे. पण भविष्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुन्हा कार्यकर्त्यांचा असाच वापर होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये, यासाठी मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मोंडकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page