⚡देवगड ता.१४-: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर होताच देवगड तालुका जि.प.पं. सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध प्रकारची २९ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकात नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी पथकप्रमुख म्हणून कामकाज पाहणार असून प्रत्येक पथकात सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि शिपाई आदी कर्मचारी असणार आहेत.
देवगड तालुका जि.प.पं. सार्वत्रिक निवडणूक २०२५ सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांनी प्रत्येक पथकाच्या कामकाजाबाबत सूचना देत पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार रमेश पवार, निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी एस.डी. गुट्टे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
