⚡मालवण ता.१४-:
मालवण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानतानाच आमदार निलेश राणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे आश्वासक ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे, त्यामध्ये सक्रिय सहभागी होता येणार असल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. कांदळगावकर म्हणाले की, २०१६ ते २०२१ या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मालवण पालिकेमध्ये अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली. मात्र, त्या काळातील दोन वर्षांचे कोरोना संकट आणि शासनाकडून निधी उपलब्ध होण्यात आलेल्या अडचणींमुळे काही कामांना विलंब झाला होता. त्यानंतरची चार वर्षे प्रशासकीय राजवट असल्याने आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे काही कामे अद्यापही अपूर्ण आहेत. आता स्वीकृत नगरसेवक म्हणून नूतन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल.
नगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून २१ वर्षे केलेली सेवा आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून ५ वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग शहराच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी नक्कीच करेन. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता शहराच्या हितासाठी मी सदैव कार्यरत राहीन असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नव्या विकासकामांना गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
