⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा देऊळवाडी येथे
अज्ञात चोरट्याने वीज मीटरच्या उघड्या बॉक्समध्ये ठेवलेल्या घराच्या चावीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश करून
एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद आज 12 जानेवारी रोजी पल्लवी पांडुरंग परब (वय 49, रा. परबवाडा शिरोडा,ता. वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली आहे.ही चोरीची घटना शनिवार दि.10 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वा. ते दुपारी 2 वाजण्याच्या मुदतीत घडली आहे.यामध्ये 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे सुमारे चार तोळे वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र,
20 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन,
50 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन आणि
15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण
2,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. दरम्यान दोन दिवस घरात शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने आज फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी व त्यांचे पती घराबाहेर गेलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने वीज मीटरच्या उघड्या बॉक्समध्ये ठेवलेल्या घराच्या चावीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश करून मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दाखल फिर्यादीनुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय योगेश राठोड हे करीत आहेत.
शिरोडा येथे धाडसी घरफोडी : सुमारे 2.5 लाखाचा मुद्देमाल चोरीस…
