⚡मालवण ता.११-:
कट्टा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार यावर्षी चौके गावचे सुपुत्र श्री. गोपाळ सहदेव चौकेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके च्या सभागृहात चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, सदाशिव गावडे गुरुजी, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.सुमेधा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. गोपाळ चौकेकर हे चौके गावचे रहिवासी असून ते अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोपाळ चौकेकर हे चौके येथील भ. ता. चव्हाण, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय शाळेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते स्वभावाने अत्यंत नम्र असून सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सन २००७ मध्ये ते मालवण पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. त्या काळात त्यांनी सर्व सामान्य लोकांच्या अनेक प्रश्नांना पंचायत समिती मध्ये उपस्थित करून त्यांची सोडवणूक करून घेतली. सार्वजनिक विकासाच्या अनेक योजना आपल्या भागात कार्यक्षमतेने पूर्ण करून घेतल्या. दारिद्र्य रेषेखालील लोकांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ अनेक गरजू लोकाना मिळवून दिला. चौके गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा अपंग संस्थेतफे आदर्श सरपंच पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. जिल्हा व तालुका समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचा बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेवक पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे २५ वे वर्ष आहे.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बापू तळवडेकर, वैष्णवी लाड, शाम पावसकर, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, विकास म्हाडगुत यांनी केले आहे.
