⚡वेंगुर्ला ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत सन २०२५–२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण, वैयक्तिक लाभ वितरण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पूर्ण प्राथमिक शाळा बांबुळी ता. कुडाळ येथील पदवीधर शिक्षिका गायत्री गुरुनाथ धुरी यांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय यशाबद्दल शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२४–२५ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या प्रकारात गायत्री धुरी यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले. याचबरोबर नेहरू सायन्स सेंटर, मुंबई येथे डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित Western India Science Fair (२०२५–२६) अंतर्गत त्यांनी सादर केलेल्या संशोधन व शैक्षणिक साहित्याला राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून नव्या शिक्षकांना संशोधन व नवोपक्रमासाठी प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातील शाळेत कार्यरत असूनही नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, व संशोधनात्मक दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याबद्दल मान्यवरांनी त्यांची विशेष प्रशंसा केली.या सन्मान सोहळ्यास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
पुंड , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, प्रकल्प संचालक पाटील तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी, “जिल्ह्यातील शिक्षक संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करीत आहेत, ही सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब आहे,” असे नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनीही सौ. धुरी यांच्या कार्याचा गौरव केला.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय यशाबद्दल गायत्री धुरी यांचा सन्मान…
