रोख रकमेसह कागदपत्रांनी भरलेले पाकीट पर्यटकाला केले परत…
⚡मालवण,ता.०९-:
मालवण येथील रॉक गार्डन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे सोलापूर येथील पर्यटकाला त्याचे हरवलेले पाकीट परत मिळाले आहे. देवगड-तळेबाजार येथील रहिवासी आणि येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहायक नंदकिशोर मांजरेकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी सभापतींचे सेवानिवृत्त स्वीय सहायक नंदकिशोर मांजरेकर हे आपल्या नातेवाईकांसह येथील प्रसिद्ध रॉक गार्डन येथे पर्यटनासाठी गेले होते. बागेत फेरफटका मारत असताना त्यांना एका बाकावर एक पाकीट पडलेले दिसले. मांजरेकर यांनी ते पाकीट उचलले असता त्यात महत्त्वाची कागदपत्रे आणि मोठी रक्कम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मांजरेकर यांनी तात्काळ लगतच असलेल्या पोलीस ठाण्यात जात तेथील पोलीस कर्मचारी सुधीर लोंढे यांच्याकडे पाकीट स्वाधीन केले. पोलिसांनी पाकिटाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि काही महत्त्वाचे वैयक्तिक दस्तऐवज आढळून आले. तपासणी अंती हे पाकीट सोलापूर येथील पर्यटक विश्वजीत जाधव यांचे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस कर्मचारी लोंढे यांनी पाकिटातील कागदपत्रांच्या आधारे तात्काळ विश्वजीत जाधव यांचा शोध घेतला. जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेत पाकिटातील रकमेची आणि कागदपत्रांची खात्री करून घेण्यात आली. त्यानंतर नंदकिशोर मांजरेकर यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी लोंढे यांनी हे पाकीट मूळ मालक विश्वजीत जाधव यांना सुपूर्द केले.
आपले मौल्यवान पाकीट आणि पैसे परत मिळाल्याने विश्वजीत जाधव यांनी मांजरेकर आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. आजच्या धावपळीच्या युगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे मांजरेकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. या घटनेमुळे मालवण पोलिसांचे आणि मांजरेकर यांचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
