रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीत समावेश नको…

ग्रामसभेत एकमताने ठराव: विविध विकास कामांवर झाली चर्चा..

⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीच संपादित झाली आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता ऐतिहासिक वारसा असलेल्या रानबांबुळी गाव वगळून सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत करा.तसेच ७७ हेक्टर क्षेत्रातील विकसीत झोन वगळावा, रानबाबुळी गावाचा नगरपंचायत मध्ये समावेश करण्यास आमचा गावाचा ठाम विरोध आहे. असा ठराव रानबांबुळी ग्रामपंचायत ग्रामसभेने एकमताने घेतला आहे .

 कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी गावची ग्रामसभा आज सरपंच परशुराम परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच अंजली कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक,  माजी सरपंच वसंत बांबुळकर , काका परब ,अशोक परब ,प्रसाद गावडे, संजय लाड आदींसह गावातील दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. पाणी योजना, रस्ते ,दिवाबत्ती, वित्त आयोग अंतर्गत व राष्ट्रीय पेयजलअंतर्गत घेण्यात आलेली विकास कामे यासह विविध जनतेच्या विकासात्मक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या चर्चेत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत ही अनाव, ओरोस, रांनबांबुळी या तीन गावांचा समावेश करून करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयाच्या भूसंपादनात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयसाठी रानबांबूळी गावाची सर्वाधिक जमीन गेली आहे. याशिवाय धरण, कोकण रेल्वे प्रकल्प यामध्येही रानबांबुळी गावाची सर्वाधिक जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे नगरपंचायत करावयाची झाल्यास रानबांबुळी गाव वगळून नगरपंचायत करण्यास आमचा विरोध नाही. गावातील या तीन प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या सर्वाधिक क्षेत्राचा विचार करता प्राधिकरण क्षेत्रात रस्त्यालगत परबवाडी सह काही वस्ती मधील जमीन वगळण्यात यावी. अशीही आमची मागणी असून वाडी वस्ती या निकषाखाली सदरची क्षेत्र वगळावे. रानबाबुळी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले गाव असून हे रानबाबुळी गाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहिल्यास गावाचे नाव अबाधित राहील, न पेक्षा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीमध्ये रानबाबुळी गावाचे नाव पुसून जाणार आहे. त्यामुळे रानबाबुळी गाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात घेण्यास आमचा पूर्ण गावाचा कडाडून विरोध आहे. वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करू असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे. रानबांबुळी गावाच्या चारही सीमांवर रानबांबूळी ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करीत आहे असे फलकही लावण्यात यावे. अशी सूचना करण्यात आली.तसेच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत असली तरी विकास कामासाठी निधी मिळणार आहे आणि नगरपंचायत मध्ये गाव समाविष्ट झाले तरी नगरोत्थान खाली निधी येणार परंतु प्रॉपर्टी कार्ड च्या आणि करवाढीमुळे गावावर भुर्दंड बसणार असून लोकांना ग्रामपंचायत मधून जसे ताबडतोब दाखले मिळतात तसे दाखले व अन्य कागदपत्रे मिळविताना हेलपाटे मारावे लागतील.अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली तर रानबांबुळी गावाचे अस्थित्व नष्ट करून आम्हाला विकास नको .असेही मत मांडण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय भूसंपादन प्रक्रियेनंतर वाढीव विकासक झोन या नावाखाली गेली अनेक वर्षे ७७ हेक्टर क्षेत्र राखीव दाखवले आहे. हे क्षेत्र आमच्या गावाच्या क्षेत्रात दाखवून त्यावरील विकसित पारंपारिक निवासी वापर झोन या पेन्सिल नोंदीरद्द कराव्यात. आणि हे क्षेत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करण्याचे ठरविण्यात आले .

You cannot copy content of this page