*💫मालवण दि.०१-:* इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गेला महिनाभर कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या कार्तिकोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री पालखी सोहळ्याने तर दुसरया दिवशी पहाटे काकड आरतीची सांगता दहिहंडी फोडून झाली.त्रिपुरारी पौर्णिमेला रात्रौ मंदिर परिसर दिपोत्सवाने उजळून निघाला होता. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला गेला. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा सर्वात मोठा महिनाभर चालणारा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. या वर्षी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. या उत्सवात कोजागिरी पौर्णिमेपासून रात्रौ पालखी सोहळा तर दुसरया दिवशी पहाटे पासून रामेश्वर मंदिरालगतच्या विठ्ठल मंदिरात काकडारतीला सुरुवात होते.रात्रौ काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्यात श्रींच्या विराजित मुर्तीसह मंदिरास पालखीची सोमसुत्री प्रदक्षिणा घातली जाते.मात्र दर सोमवारी रवळनाथ मंदिराला पालखी प्रदक्षिणा होते. कार्तिक दशमीला आचरा वरची वाडी येथील नारायण मंदिराला तर एकादशी ला देवूळवाडी येथील जुन्या विठ्ठल रखुमाई मंदिराला भेट देते. वर्षातून काही मोजक्याच दिवशी दर्शन मिळणाऱ्या पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पौर्णिमेला मिळते.रामेश्वर मंदिरालगत असलेल्या विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून काकड आरतीची सुरूवात होते. तीचा समारोप त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पावल्यांचा फेर धरत दहिहंडी फोडून केला गेला.
श्री देव रामेश्वर संस्थानच्या कार्तिकोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी सोहळ्याने सांगता
