संतप्त ग्रामस्थांचा,वाहन चालकांचा सवाल:दोन दिवसांपूर्वीच घडला होता अपघात..
⚡सावंतवाडी ता.११-: काही महीन्यापूर्वी मळेवाड ते आजगाव सावरदेव तसेच मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण , खडीकरण करण्यात आले होते मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्डे पडले असून हे खड्डे वाचविताना रस्त्यावर अपघात घडत आहेत.
तसेच या नवीन केलेल्या रस्त्यावर खडी पसरल्यामुळे वाहनचालकांना कसरतच करावी लागत आहे.
या पसरलेल्या खडीवर वाहने घसरून अपघात घडत आहेत.मात्र याकडे सार्वजनिक विभागाचे व ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असून याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालकांना, ग्रामस्थांना बसत आहे.वारंवार अपघात घडूनही संबंधित विभागाला जाग तरी कधी येणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थ वाहनचालक करत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच असाच दुचाकीस्वार छोट्या मुलीसह जात असताना गाडी खड्ड्यातील पसरलेल्या खडीवर घसरून पडली होती.तत्काळ तेथील ग्रामस्थांनी त्यांना यावेळी मदत केली.मात्र वारंवार असे अपघात घडत असून सुद्धा रस्त्यावरील खड्यांबाबत, पसरलेल्या खडी बाबत संबंधित विभाग, ठेकेदार लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत त्यामुळे तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
