“इतिहास जाणला तरच विकास घडणार”…

मंत्री आशिष शेलार:नांदोस शिवकालीन गढी उत्खननाचा शुभारंभ..

⚡मालवण ता.०७-:
जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास पण पहायचा आहे आणि विकास पण पाहायचा असल्याने भकास करणारा विकास न करता समृद्ध करणारा विकास हवा आहे. या भागात समृद्धता येण्यासाठी इतिहास मजबुतीने मांडला गेला पाहिजे. नांदोस गढीचा इतिहास समोर आल्यावर देशाच्या नकाशावर नांदोसचे नाव ठळकपणे येण्यासाठी नांदोस गावच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना दिली

मालवण तालुक्यातील नांदोस येथील शिवकालीन गढी पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ राज्याचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि प अध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जि प सदस्य अनिल कांदळकर संतोष साठविलकर, कट्टा गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, माजी जि प सदस्य बाळा महाभोज, माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, माजी नगरसेवक मंदार केणी, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शेखर मसुरकर, पुरातत्व विभाग डॉ. तेजस गर्गे, श्री वहाणे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते

मंत्री शेलार म्हणाले नांदोस गढीच्या जतन संवर्धन व उत्खननासाठी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनाच जाते नांदोस येथील गढीच्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन होऊन उत्खननात त्याकाळातील अवजारे, भांडी व इतर अनेक वस्तू सापडू शकतात. सापडणाऱ्या वस्तूंचा संबंध नागरीकरणाशी आहे का, इतर गडकिल्ल्यांशी संबंध आहे का ? हे शोधले जाईल. या भागाचा इतिहास काय होता, येथे लढाया झाल्या होत्या का, येथे वसाहत कशी होती, शेतकरी शेती कशी करायचे, सैन्य कसे राहायचे याचीही माहिती मिळू शकते. उत्खननात सापडणाऱ्या वस्तू जतन करून त्यांचे संवर्धन केले जाईल. त्यांचे मोजमाप केले होईल, छायाचित्रे काढली जातील आणि डिजिटलायझेशन केले जाईल. तसेच उत्खननाद्वारे समोर येणारा नांदोसचा इतिहास कॉफीटेबल बुक द्वारे संग्रहित केला जाईल. त्याचे प्रकाशन आम. निलेश राणे यांच्याच हस्ते केले जाईल असेही ते म्हणाले

यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, नांदोस येथील गढी उत्खननाचा स्तुत्य उपक्रम मंत्री आशिष शेलार यांनी हाती घेतला आहे आपला इतिहास आपल्याला कळला पाहिजे, त्याचे संकलन झाले पाहिजे, आणि हे काम मंत्री शेलार करू शकतात. कारण ना. शेलार ज्या विषयात हात घालतात तो विषय शेवटपर्यंत घेऊन जातात, दशावतार कलाकारांच्या अडचणी कलाकारांच्या समितीच्या माध्यमातून आपण ना. शेलार यांच्याकडे मांडल्यावर अडचणी समजून घेऊन दशावतार कलाकारांना ओळखपत्र, प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय काढून तात्काळ कार्यवाही सुरु केल्याबद्दल मी आभार मानतो. मात्र ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीत काही अडचणी येत असून त्या दूर कराव्यात असेही आम. निलेश राणे म्हणाले.

यावेळी कट्टा येथील वराडकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. ममता महेश आंगचेकर हिने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तसेच ललित विलास मेस्त्री या विद्यार्थ्यांने लाकडात कोरलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि नांदोस गढी विषयी ईशा गावडे या विद्यार्थिनी लिहिलेला माहितीपूर्ण लेख असणारा वराडकर हायस्कूल कट्टा यांचा वंदना हा वार्षीकांक कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मंत्री शेलार यांना भेट म्हणून दिला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण साटम यांनी केले तर आभार विलास वहाने मानले

You cannot copy content of this page