⚡सावंतवाडी ता.०५-: प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने तिहेरी यश प्राप्त केले. यात कर्तव्य बांदिवडेकर व कबीर पेडणेकर यांनी प्रतिकृतीमध्ये प्रथम, रेश्मा पालव हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तर प्रश्नमंजुषामध्ये जान्हवी पाटील, आर्या राणे गटाने प्रथम क्रमांक पटकाविला.
देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तर्फे चलप्रतिकृतीमध्ये प्राथमिक स्तरातून आरोग्य व स्वच्छता या विषयावर ‘स्वयंचलित स्वच्छ स्वच्छतागृह'” हा चलप्रतिकृती प्रकल्प इयत्ता आठवीतील कर्तव्य तेजस बांदिवडेकर आणि कबीर महेश पेडणेकर यांनी सादर केला होता. या चलप्रतिकृतीने सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच वक्तृत्व स्पर्धेत रेश्मा संदेश पालव हिने प्रभावी वक्तृत्व सादरीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रकारात इयत्ता नववीतील जान्हवी विश्वास पाटील आणि इयत्ता अकरावीतील आर्या सुदेश राणे यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. अशाप्रकारे प्रशालेला प्रथम मानंकाचे तिहेरी यश प्राप्त झाले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. या यशस्वी मुलांना वक्तृत्व स्पर्धेसाठी महाश्वेता कुबल, प्रश्नमंजुषासाठी पवन वनवे, पी. पी. सावंत, एस. एस. शिरोडकर तसेच प्रतिकृती निर्मितीसाठी डी. आर. शृंगारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे, सर्व संस्था सदस्य तसेच पालक,, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.
निरवडे येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आरपीडीचे तिहेरी यश…
