कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर आपल्या ताब्यातील चारचाकी ऑडी कंपनीची गाडी चालवित असताना रस्त्याच्या बाजूने चालत जात असलेल्या पादचारी यास वाहनाच्या डाव्याबाजूने जोरदार धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून आरोपीची मे. मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस मे. न्यायाधीश ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड. संजीव प्रभू आणि ॲड अश्विनी बोभाटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 8/2/2024 रोजी सकाळी 7.25 वाजण्याचे सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.66 वर मौजे हुमरमळा राणेवाडी येथे अपघात घडला.
मृत पादचारी कालिदास झणझणे हे सदर रस्त्याच्या डाव्या बाजूने गोव्याच्या दिशेने चालत जात होते, त्यावेळी आरोपी दमनदीपसिंग प्रबज्योतसिंग ओबेरॉय रा.अंधेरी मुंबई याने आपल्या ताब्यातील ऑडी कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक PB-65-AA-4411 घेऊन मुंबई ते गोवा दिशेला जात होते. अपघात घडला त्याठिकाणी आले असता तेथील रस्त्याच्या विशिष्ट पद्धतीकडे दुर्लक्ष करून, अविचाराने वाहन चालून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जात असलेल्या नमुद पादचारी यास वाहनाच्या समोरील डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे पादचारी हे अपघात घटनास्थळापासून सुमारे पंधरा फुटांवर पूर्वेस दूर कच्च्यारस्त्यावर फेकले गेले.
त्यांच्यावर झालेल्या दुखापती आणि अपघातदरम्यान त्यांच्या झालेल्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरले. त्यामुळे आरोपी विरुद्ध सिंधुदुर्गनगरी ओरोस पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान कायदा कलम 304(अ), 279, 337, 338 आणि मोटर वाहन अधिनियम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे तपासकाम पूर्ण होऊन दोषारोपपत्र सिंधुदुर्ग ओरोस येथे न्यायालयात दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध मे. न्यायालयात केसची सुनावणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षातर्फे गुन्हा शाबीत होण्याजोगा सबळ पुरावा न आल्याने तसेच अपघाताचे वेळी आरोपी हेच वाहन चालवित होते, हे सरकारपक्षाने शाबीत केलेले नाही, हा आरोपीतर्फे वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अपघातात पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता…
