चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव दिंडे जत्रा उद्या पासून…

४ ते ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

⚡मालवण ता.०३-:
वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेली चिंदर गावच्या भगवती माऊली चा यात्रोत्सव दिंडे जत्रा उद्या ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. पाच दिवस चालणा-या या उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आला आहे.

गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी भगवती माऊलीची विधिवत महापूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी ९ वाजता यात्रेकरू भाविकांचे स्वागत व भगवती माऊलीच्या दर्शनाला सुरुवात, सकाळी ११ वाजल्या पासून भगवती माऊलीस मानक-यांचा महाप्रसाद अर्पण, दिवसभर देवी ओटी, नवस, साकडे आदी, रात्रौ ११ वाजल्या नंतर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहेत. पहाटे ३ वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.

शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडी, ६.३० वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री ७.३० वा. गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ वाजल्यानंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.

शनिवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक भजने यात ४ वा. श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी,५.३० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी, ६. ३० वा. श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे भजन, ७. ३० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन होणार आहे.

रविवार ७ डिसेंबर रोजी ५.३० वा श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, ६.३० वा श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरई वाडी, ७.३० वा. श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम.
रात्रौ. १०.३० वा. श्री भवानी रामेश्वर डंपर सर्विस मनोज हडकर पुरस्कृत, श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा महान दशावतार नाट्य प्रयोग “वेसरोत्पत्ती” सादर होणार आहे.

सोमवार ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ६ वा. चालू वहिवाट दार घाडी कुटुंबिय, सर्व महिला यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वा. श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, ७ वा. श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत. रात्रौ ९ वा. पुराण, रात्रौ १० वा. भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित कौटुंबिक, सामाजिक, हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक “सासुरवास” सादर होणार आहे. यानंतर रात्रौ २.३० नंतर गोंधळ किर्तन, लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर, ग्रामस्थ याच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page