कुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी…

कुडाळ पोलिसांकडून आतापर्यंत चालूवर्षात ८ जणांची हद्दपारी..

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार, रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय 30 वर्षे, रा. आकेरी, घाडीवाडी, ता. कुडाळ) आणि आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी (वय 33 वर्षे रा. माणगांव कुंभारवाडी, ता. कुडाळ) याना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान कुडाळ पोलीसांनी चालू वर्षात एकूण ८ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.
कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर,अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना दिलेले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित करुन कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील घरफोडी चोरीचे ७ गुन्हे दाखल असणारा तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील ४ गुन्हयात शिक्षा भोगुन बाहेर आलेला अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी, वय ३० वर्षे, रा. आकेरी, घाडीवाडी, ता. कुडाळ तसेच अवैध अग्निशस्त्र (बंदुका) बनविण्याचा कारखाना चालविणारा ज्यावर शस्त्र अधिनयमाखाली कुडाळ पोलीस ठाण्यात २ व दापोली जि. रत्नागिरी येथे २ असे एकूण ४ गुन्हे दाखल असलेला आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी, वय ३३ वर्षे रा. माणगांव कुंभारवाडी, ता. कुडाळ त्याविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता स्वतंत्र अहवाल उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयात या प्रस्तावाची सुनावणी होवुन नमुद सराईत गुन्हेगार यांना एक वर्षाकरीता सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन हद्दपार करण्याचे दि.१ डिसेंबर २०२५ रोजी आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार या गुन्हेगारांस हद्दपारीचे आदेशाची कुडाळ पोलीस ठाण्या मार्फत आज दि. २ डिसेंबर २०२५ रोजी बजावणी करण्यात आली असुन या आरोपीपैकी रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी यास गोवा राज्यात व आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी विरार-मुंबई येथे आज दि. २ डिसेंबर २०२५ रोजी पाविण्यात आले.
हि कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार, गजेंद्र भिसे, दयानंद चव्हाण, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर, सुजाता तेंडोलकर, समीर बांदेकर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page