जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:४ नगराध्यक्षसाठी १८ आणि ७७ नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवार रिंगणात..
ओरोस ता १
तीन नगरपरिषद, एका नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळावर २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. चारही पंचायतींच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी १८ तर ७७ नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ५७ हजार २७७ मतदार निश्चित झाले आहेत. दरम्यान, यासाठी जिल्ह्याची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान यंत्रे आणि सुरक्षा यंत्रणेसह निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी सोमवारी सायंकाळीच निश्चित झालेल्या ७४ मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी दुपारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, नगरपंचायत जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंदकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्रीमती धोडमिसे यांनी, निवडणुका होत असलेल्या तिन्ही नगरपरिषद आणि एक नगरपंचायत या क वर्ग मध्ये येत असल्याने तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभारावर पर्यवेक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे चार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे सांगितले
निश्चित झालेल्या ७४ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चारही निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या शिवाय विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली आणि मालवण येथे चार तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे प्रत्येकी तीन विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुका लागलेल्या चारही पंचायतींची आरक्षण मर्यादा ५० टक्केच्या पुढे गेलेले नाही. तसेच एकही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेली नाही. त्यामुळे चारही नगराध्यक्ष आणि ७७ नगरसेवक पदासाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे, असे त्यांनी सांगितले.
