अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

मळेवाड-भोम व धनगर सडा येथील घटना..

⚡सावंतवाडी ता.३०-: आज दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत मळेवाड-भोम व धनगर सडा येथील शेतकऱ्यांच्या काजू झाडांचे व गुरांसाठी लागणाऱ्या गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीची घटना कळताच मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सावंतवाडी अग्नीशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब येईपर्यंत येथील शेतकऱ्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग काही केल्या विझत नव्हती. घटनास्थळी अग्नी शमनदलाचा पाण्याचा बंब दाखल होताच स्थानिकांच्या मदतीने आग काही प्रमाणात विझविण्यात आली. मात्र दुपारच्या वेळी लागलेल्या आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाल्याने शेतकऱ्यांनी गुरांसाठी ठेवलेले गवत जळून खाक झाले तर काही शेतकऱ्यांची काजूची झाडे या आगीच्या भक्षस्थानी पडली. त्यामुळे ऐन काजूच्या हंगामात लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच अवकाळी पाऊस, जंगली प्राणी यामुळे त्रस्त झालेले शेतकरी त्यात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत पोलिसांनी सदरील अज्ञान व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page