रुपेश राऊळ:पालकमंत्री होऊन नितेश राणे यांनीही नेमका कोणता विकास केला हे जनतेला सांगावे..
⚡ सावंतवाडी ता.३०-:
सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. “विकासाच्या नावाने बोलणाऱ्या लोकांना आज मतदारांना पैसे वाटण्याची वेळ आली आहे. पुढील पाच वर्षे हेच लोक विकास करतील का, याचा नागरिकांनी गंभीर विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावरही टीकास्त्र सोडले. “केसरकर यांनी जर विकास केला असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडीत सभा का घ्यावी लागत आहे? आजची सभा ही केसरकर यांची रिटायरमेंट सभा ठरेल,” असा दावा राऊळ यांनी केला.
शहरातील केसरकर यांची अवस्था बिकट झाल्याने शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री प्रचारासाठी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी धनशक्तीला बळी न पडता शिवसेनेच्या निष्ठावान उमेदवारांना मशाल चिन्हावर मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून विकासकामे मागे पडली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनीही नेमका कोणता विकास केला हे जनतेला सांगावे,” अशी मागणी राऊळ यांनी केली. जनता यावेळी योग्य निर्णय घेऊन इतिहास रचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
