प्रभाकर सावंत:संजू परब यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही;विशाल परब यांचे निलंबन मागे घेणे हा वरिष्ठ स्तरावर झालेला निर्णय..
⚡सावंतवाडी ता.२४-: “आमची स्पर्धा कोणाशी नाही, आमची स्पर्धा विकासावरच आहे,” असे स्पष्ट वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
सावंत म्हणाले की, “आमचे सर्व उमेदवार सर्व प्रभागात फिरत आहेत आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे.”
संजू परब यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. विशाल परब यांचे निलंबन मागे घेणे हा वरिष्ठ स्तरावर झालेला निर्णय असून याचा खालच्या पातळीशी कोणताही संबंध नाही.”
फडणवीस यांच्या सभेबाबत विचारले असता सावंत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार की नाही, याबाबत अद्याप अध्यक्षांनी स्पष्ट केलेले नाही. लवकरच याबाबत आम्ही अधिकृत माहिती देऊ.”नगराध्यक्ष पदावर पोटनिवडणुकीत आमचा उमेदवार निवडून आलेला असतानाही कोरोना काळामुळे काही विकासकामे पूर्ण करता आली नाहीत, असे सांगत त्यांनी आश्वासन दिले की, “येणाऱ्या पाच वर्षांत ही सर्व अपूर्ण कामे आम्ही पूर्ण करू.”
दरम्यान, “मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत. ते जिल्ह्यात किती तास उपस्थित असतात हे सर्वांनाच माहिती आहे,” असेही त्यांनी सांगितले.
अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या बंडखोरीबाबत विचारले असता सावंत म्हणाले, “याचा कोणत्याही प्रकारे आम्हाला फटका बसणार नाही.”
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी सर्व मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत निवडणूक विकासाच्या अजेंड्यावरच लढवत असल्याचा पुनरुच्चार केला.
