देवस्थान जमिनींच्या सर्व्हेविरोधात शेतकऱ्यांची नाराजी…

मंगेश तळवणेकर:१५ दिवसांत मोठ्या आंदोलन छेडण्याचा दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.२२-:
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडील जमिनींच्या सुरू असलेल्या सर्व्हेच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, पुढील १५ दिवसांत मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा श्री देव विठ्ठल रुखुमाई शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री. मंगेश तळवणेकर यांनी याबाबत समिती सचिवांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, देवस्थान समितीच्या मालकीच्या जमिनी पिढ्यान् पिढ्या शेतकरी, मानकरी व चाकर वर्ग कसत आला आहे. अनेकांच्या नावावर या जमिनी कुळ म्हणून नोंद असून, शेती, बागायती व अन्य उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अचानकपणे या जमिनींचा सर्व्हे मुंबईतील ‘सारा आयटी’ कंपनीमार्फत करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळवणेकर यांनी आरोप केला की, कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. संबंधित वहीवाटदारांना न नोटीस, न कळवणूक — असा मनमानी पद्धतीचा कारभार सुरू आहे. याआधीही अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर जमीन ‘वन विभाग’ दाखवून त्यांच्या हक्कांवर घाला घालण्यात आला होता. आता देवस्थानच्या जमिनींच्या संदर्भातही अशीच कारवाई होत असल्याचा शेतकऱ्यांचा संशय आहे.

स्मार्ट मीटरप्रकरणी झालेल्या अनुभवाकडेही त्यांनी लक्ष वेधले. घरात कोणी नसतानाही गुपचूप मीटर बदलणे, तीनपट बिले वाढणे — अशीच पद्धत येथेही राबवली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

“देवस्थान जमिनींच्या सर्व्हेमागे संशयास्पद हेतू असून हा प्रकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. हा सर्व्हे तातडीने बंद करावा, तसेच जनसुनावणी घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे. अन्यथा व्यापक आंदोलन उभारावे लागेल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनाची प्रत देवस्थान व्यवस्थापन समितीला सादर करण्यात आली असून, शेतकरी मोठ्या आंदोलनासाठी सज्ज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page