सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न अजूनही मार्गी का लागला नाही…?

रवि जाधव:‘जनतेची दिशाभूल नको; प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा’..

⚡सावंतवाडी, ता.२२-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात 2019 मध्येच शासन आदेश निघूनही अद्याप हॉस्पिटल उभारणीला सुरूवात का नाही झाली…? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी उपस्थित केला आहे. जागा उपलब्ध, निधी उपलब्ध असूनही हॉस्पिटलचे काम रखडवून लोकांची दिशाभूल करण्यात येत आल्याचा आरोप त्यांनी केला.

रवी जाधव म्हणाले, “2018 मध्येच शासनाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी बजेट मंजूर केले होते. 2019 मध्ये टाऊन प्लानिंग विभागाने सावंतवाडीत जागा आरक्षित केली होती. मग जागेच्या नावाखाली इतका गोंधळ का घातला? जनता आजही प्रश्न सोडवला जाईल, या आशेवर आहे; पण नेत्यांनी फक्त घोषणाच केल्या.”

ते पुढे म्हणाले की, जागा उपलब्ध असल्याचे शासनाच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट नमूद असूनही अन्यत्र जागा शोधण्याचे ढोंग करण्यात आले. “जसे मळगाव टर्मिनसच्या प्रश्नात घोळ घालण्यात आला, तसेच हॉस्पिटलप्रश्नीही नागरिकांची दिशाभूल करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

त्या काळात स्थानिक आमदार, जिल्हाप्रमुख आणि तत्कालीन नगराध्यक्ष यांच्यात झालेल्या तीव्र राजकीय वादामुळे विकासकामे ठप्प झाली आणि त्याचा सर्वाधिक फटका सावंतवाडीकरांना बसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. “मडुरा की सावंतवाडी या वादात शहर विकासाच्या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नुकसान झाले; आणि आता तेच कट्टर विरोधक एकत्र प्रचारात दिसत आहेत,” असे ते म्हणाले.

“विरोधक आता एकत्र आले असले तरी जनतेचे झालेले नुकसान कोण भरून काढणार? एवढ्या वर्षांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटेल अशी जनतेची अपेक्षा होती; मात्र तीही फोल ठरली,” अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.

जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जनतेची दिशाभूल करणारे तत्कालीन सत्ताधारी आता मतांसाठी सावंतवाडीत येतील. पण मते मागण्यापूर्वी त्यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलप्रश्नी सावंतवाडीकरांना हिशेब द्यावा.”

सावंतवाडीकरांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्वाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

You cannot copy content of this page