बांदा / प्रतिनिधी
पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारा संचलित पतंजली योग समिती बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांना नुकतीच वीस वर्षे पूर्ण झाली. बांदा ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व पतंजली योग समिती गोवा राज्याचे प्रभारी आदरणीय श्री. विश्वासजी कोरगावकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योगवर्गाने आज भक्कम वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून हा वर्ग पूर्णपणे निशुल्क चालविला जात असून याचा लाभ बांदा दशक्रोशीतील शेकडो नागरिकांनी घेतला आहे आणि आजही घेत आहेत.
दररोज सकाळी ५.३० ते ७ या वेळेत घेण्यात येणाऱ्या या योगवर्गात योगपचार, मोटापा निवारण शिबिर, सूर्यनमस्कार दिन, गुढीपाडवा रॅली, सहयोगशिक्षक परीक्षा, सामूहिक श्रमदान, योग सहली आदी विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. शारीरिक व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान, मानसिक संतुलन, राग–रोग नियंत्रण व योगपचार यांसारख्या सर्वांगीण योगाभ्यासातून समाजाला निरोगी जीवनाची गुरुकिल्ली सुपूर्द करण्याचे कार्य या समितीमार्फत होत आहे.
आजच्या डिजिटल व धकाधकीच्या युगात मन व शरीर यांची सुवर्ण सांगड घालणाऱ्या या योगसेवेचे महत्त्व अधिक वाढले असून पतंजलीच्या माध्यमातून याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिक घेत आहेत. समितीची व्याप्ती आज फक्त बांदापुरती मर्यादित न राहता संपूर्ण दशक्रोशीत चार अतिरिक्त योगवर्ग नियमित सुरू आहेत. या विस्ताराचे श्रेय पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना जाते.
आजूबाजूच्या गावांमध्ये योगवर्ग किंवा योगशिबिर सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांनी पतंजली योग समितीशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी
संपर्क नंदादीप केळुस्कर ९६८९८९५९६६, सौ. राजश्री तेंडले ९७६५३१४४२६ यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
