मळगाव येथे झालेल्या काव्यवाचन स्पर्धेत बांद्याच्या नैतिक मोरजकरचा चमकदार विजय…

बांदा/प्रतिनिधी
राधारंग फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मळगाव इंग्लिश स्कुल येथे आयोजित करण्यात आलेल्या (कै.) सौ. अनुराधा तिरोडकर स्मृती जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचा आठव्या इयत्तेतील विद्यार्थी नैतिक नीलेश मोरजकर याने प्रभावी काव्यसादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रुपये १५०० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी ‘पाऊस’ हा विषय देण्यात आला होता.
स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शारदामातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, राधारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, माड्याचीवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक सामंत, खजिनदार सचिन सामंत, सदस्य अरुणा सामंत, गुरुनाथ नार्वेकर, प्रथमेश नाईक तसेच परीक्षक शंकर प्रभू व मंगल नाईक-जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत हर्षिता सहदेव राऊळ (मळगाव इंग्लिश स्कूल) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तिला रोख रुपये १००० व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गौरी राजन गावडे (जि. प. पूर्ण प्राथ. शाळा क्र. १, कास) हिने तृतीय क्रमांक पटकावत रोख रुपये ७५० व सन्मानचिन्ह प्राप्त केले. सानवी सचिन देसाई (खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा) हिला उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून रुपये ५०० व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. अरुणा सामंत यांनी राधारंग फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. परीक्षक शंकर प्रभू यांनी मुलांना मार्गदर्शन करत सर्वच स्पर्धकांनी मांडलेल्या कविता कल्पकतेने समृद्ध असून कौतुकास पात्र असल्याचे सांगितले. यावेळी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी नसलेल्या काही विद्यार्थ्यांनीही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. हेमंत खानोलकर यांनी आभार मानले.
फोटो:-
मळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धेतील विजेता नैतिक मोरजकर याला सन्मानित करताना मान्यवर.

You cannot copy content of this page