⚡मालवण ता.१५-: ऑक्टोबर महिन्यात दिवाळी उत्सव कालावधीत मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविल्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार श्री. उत्तम सूर्यकांत फोंडेकर व श्री. आबा फोंडेकर यांचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्राद्वारे कौतुक करत अभिनंदन केले आहे. आधुनिक शेतीच्या काळात आपण हापूस आंब्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, अशा शब्दात मंत्री श्री. भरणे यांनी फोंडेकर बंधुंचे कौतुक केले आहे.
गेली पाच वर्षे सातत्याने मालवण कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई पुणे सह परजिल्ह्यात पाठविणारे पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दीपावलीच्या मुहूर्तावर दोन डझन हापूस आंब्याची पेटी सातारा येथे अवधूत शिंदे यांच्याकडे पाठविली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली असून फोंडेकर बंधू यांचे अभिनंदन करणारे पत्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तम फोंडेकर यांना पाठविले आहे. “हापूस आंबा हा कोकणची शान असून आपण या हापूस आंब्याची ओळख राज्याच्या विविध भागामध्ये केली आहे. आधुनिक शेतीच्या काळात आपण हापूस आंब्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, आपल्या मेहनतीस तसेच भविष्यातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा” असे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रामध्ये म्हणत फोंडेकर यांचे अभिनंदन केले आहे.
