प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा; चर्चेला अखेर पूर्णविराम..
सावंतवाडी, ता. ०४-:गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता ते आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून डिसोजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सावंतवाडी तालुक्यात सुरू होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचा प्रवेश काही दिवस लांबला होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय निश्चित झाल्याची माहिती मायकल डिसोजा यांनी स्वतः दिली.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडीतील विशाल परब यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या औचित्यावर मायकल डिसोजा यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
