जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सबंधित अधिकाऱ्याला करावे निलंबित; अमित इब्रामपूरकर मनसेतर्फे करणार मागणी*
*💫मालवण दि.०९-:* काल मालवण मध्ये कोविड लसीकरणा दरम्यान झालेला प्रकार हा दुर्दैवी असून, जेष्ठ नागरीकांना डावलुन काही ठराविक लोकांना फोन करून बोलवून घेणे आणि त्यांचे लसीकरण करणे शासनाच्या नियमा विरोधात असल्याने जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेतर्फे करणार असल्याची माहीती मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की शासन नियमाप्रमाणे वयाच्या १८ ते ४४ दरम्यानच्या लोकांनी नोंदणी करावी. तारीख, वेळ घेऊन लसीकरणासाठी संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे अशा प्रकारे केंद्र शासनाची लसीकरणाबाबत नियमावली आहे. परंतु, वय ४५ ते पुढील लोकांना अशाप्रकारच्या नोंदणीतुन सूट देण्यात आली होती. दि.६ मे २०२१ च्या केंद्रशासनाच्या आदेशानुसार वय ४५ वरच्या सर्व लोकांनाही लसीकरण केंद्रात नोंदणी आवश्यक तसेच वय ४५ च्या वर ज्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना लसीकरण केंद्रावर दुसरा डोससाठी पहिली हजेरी, पहिलं प्राधान्य असा शासनाचा आदेश आहे. परंतु, शासनाचा अशा प्रकारचा आदेश डावलुन फोन करुन काही ठराविक लोकांनाच बोलावून लस देण्याचा प्रकार मालवण ग्रामीण रुग्णालयातुन होत आहे. त्याचे पुरावे देखील मनसेकडे आहेत. केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार गर्दी टाळण्यासाठी ४५ वर्ष आणि अधिक वर्षाच्या लोकांनाही नोंदणी करणे आता अनिवार्य केली आहे. हे सर्व नियम धाब्यावर बसवून काही ठराविक राजकिय नेतेमंडळीना हाताशी धरुन ठराविक लोकांचे लसीकरण करणे शासनाच्या नियमाविरोधात असल्याने व झालेली बाब गंभीर असल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालुन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मनविसे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. ४५ वरील लोकांनी लसीकरण केंद्रावर ती रांग लावून लस घेणे अशा प्रकारचा शासन निर्णय सांगतो. यामुळे मालवणातील काही जेष्ठ नागरीक पहाटे ५.०० वाजल्यापासुन लससाठी रांगा लावत आहेत. असे असताना मालवणात काल घडलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून, काही ठराविक लोकांना संबंधित यंत्रणेकडुन संध्याकाळनंतर फोन करून लसीकरणासाठी उद्या सकाळी या तुम्हाला लगेच लस दिली जाईल अशाप्रकारे सूचना दिली जाते. अशा प्रकारे सूचना देणे हे शासनाच्या नियमाच्या विरोधात असून जे लोक गेले पंधरा दिवस दुसऱ्या डोससाठी सकाळी पाच वाजल्यापासून लस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत त्यांच्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेला अन्याय आहे. म्हणूनच सदर लसीकरण नोंदणीची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी मनसेतर्फे करत असल्याची माहीती अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.