कणकवली पं.स. सदस्यपदांचे आरक्षण जाहीर…

कणकवली : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कणकवली पंचायत समिती सदस्य पदांसाठी सोमवारीकणकवली तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये एकूण १६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव ठरले आहेत. यापैकी जानवली गण अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाला असून, या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद हे आधीच ना.मा.प्र. महिलांसाठी राखीव आहे.

आरक्षण सोडत प्रक्रियेला प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. चिठ्ठीद्वारे ही सोडत पार पडली. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जानवली गण अनुसूचित जातीसाठी राखीव ठरविण्यात आला असून, मागील आरक्षणाचा विचार करून तो गण अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव करण्यात आला आहे.

त्यानंतर उर्वरित गणांमध्ये ना.मा.प्र. साठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कलमठ, कासार्डे, नांदगाव आणि नाटळ हे गण ना.मा.प्र. साठी राखीव झाले. ५० टक्के महिला आरक्षणाच्या तरतुदीनुसार या चार गणांपैकी दोन गण महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार नांदगाव व नाटळ हे गण ना.मा.प्र. महिला साठी राखीव झाले आहेत.

उर्वरित ११ गणांपैकी सर्वसाधारण गटातील महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. यात बीडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओरसगाव आणि नरडवे हे गण सर्वसाधारण महिला साठी राखीव झाले आहेत. तर फोंडा-करूळ, खारेपाटण, वरवडे, हरकुळ खुर्द, तळेरे आणि कळसुली हे गण सर्वसाधारण (पुरुष/मुक्त) साठी राखीव ठरले.

आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्याचे काम विद्यामंदिर विद्यालयातील विद्यार्थिनी देविश्री पाटील व विद्यार्थी पार्थ तेली यांनी पार पाडले. या प्रक्रियेदरम्यान नायब तहसीलदार मंगेश यादव, एम. पी. मंडले, महिला पोलीस विनया सावंत, तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page