Headlines

मडुऱ्यात हत्तीने घेतले चव्हाट्याचे दर्शन; ग्रामस्थांत आश्चर्याचा विषय…

⚡बांदा ता.१२-:
मडुरा परबवाडी येथे शनिवारी रात्री ओमकार हत्तीने थेट श्री देव चव्हाटा मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याची अनोखी घटना घडली. प्रथम मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचून तो सुमारे 10 मीटर अंतरावर थांबला. मात्र ग्रामस्थांनी त्याला हाक दिल्याने पुन्हा माघारी वळला आणि काही क्षणांत पुन्हा मंदिरात गेला. या दृश्याने ग्रामस्थ थक्क झाले.
या घटनेने ग्रामस्थांत भक्तिभाव आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीला आता मानवी सान्निध्य प्रिय वाटू लागले आहे, असा समज स्थानिकांमध्ये आहे. दरम्यान, वनविभागाला अद्याप हत्तीचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही, मात्र ग्रामस्थांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

ओमकार हत्तीचे देवदर्शन हा प्रकार संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, श्रद्धा आणि निसर्गातील अद्भुत नात्याचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे.

चौकट——
बंदोबस्तासाठी यंत्रणा कधी येणार : बाळू गावडे

गेल्या सहा दिवसांपासून मडुरा परिसरात फिरणारा हा हत्ती आता पूर्णपणे माणसाळल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत शेतीचे नुकसान होत असून वनविभाग मात्र फटाके लावणे आणि रात्रीच्यावेळी ब्याटरी दाखविण्याचे काम करत आहे. हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी नेमकी यंत्रणा कधी येणार असा सवाल मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केला आहे.

फोटो——
मडुरा : चव्हाट्यावर आलेला ओंकार हत्ती.

You cannot copy content of this page